निळ्याशार आकाशावर
कुणी शिंपली साय पांढरी ?
लुकलुकणाऱ्या चांदण्यातुनी
गोष्ट आपली सांगे सारी
नभोमंडपी अगणित तारे
वाऱ्यासंगे झुलती सारे
खेळ सगळा हा अंधाराचा
कोण स्तब्ध तर कोण फिरे
या सगळ्यातून एकच तेज
निळ्या निळाईला भावले
शुभ्र पांढऱ्या ताऱ्याने
या नभाचे रंग चोरले
रात्र काळोखी दिवस पांढरा
सारीपाट हा क्षितिजी सांडला
ताऱ्याने या नभाकडे
सोबतीचा हट्ट मांडला
निरागस या नभाला
एक शब्द हि फुटेना
रात्र सगळी त्याचीच होती
पण दिवसाचा प्रश्न सुटेना
नभ ,तारे शांत सारे
आभाळ झाले केविलवाणे
कुणी कुणाला समजून घ्यावे
इथे सारेच विरहगाणे
अनावर सारेच दुख
नभाला अश्रू फुटले
ताऱ्यालाही या उमगेना
आपण झालो कुणाचे कुठले
सारीपाटाची काळी चौकट
नाभासंगे सोबत तारा
पहाटे या नभाला
निरोप द्यावा कसा कळेना
पहाटेचे किरण पहिले
आकाश सारे उजळून गेले
कुठे शोधिसी या ताऱ्याला
त्याचेच तर रविकिरण झाले
'कोण सांगतो मी एकटा ?'
नभाचा प्रश्न शेवटचा
दिवस रात्र ताऱ्याची सोबत
खेळ जिंकला मी साऱ्यांचा
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)