काल पाजविला मी
मायेचा पान्हा - पाझर ,
वेल मोगरीची दारी
नकळत चढली झरझर
विभ्रम विलोल देखणे
वाऱ्यापरी अवखळ ,
विसंबले न मी कधी
दूर केले न पळभर
लहानाची केली मोठी
तेल घालूनिया डोळी ,
पूर्ण बहरेल सासरी
फुलेल पाकळी पाकळी
चाफ्यासाठी हिरव्या तुमच्या
श्रीफळ तुमचा लेक
जतन केली जाई ,
पालन करा मायेने
आता तुम्हीच तिची आई
लाडली लाडकी आमची
तळहाताचा असे फोड ,
शोभेल तुमच्या घरी
नारायण लक्ष्मीचा जोड
चंदन तुमचा लेक
घासलिया दर्वळे वास ,
माझ्या लेकीच्या गुणांचा
जाणावे आपोआप सुवास
श्रीफळ तुमचा लेक
लेक माझी द्राक्षघोस ,
लेकीवाचून वाटे आम्हा
घर भरले ओस - ओस
भास्कर तुमचा लेक
लेक माझी चंद्रमा ,
श्री शंभू तुमचा लेक
त्या शोभे माझी उमा
हिरा पैलूदार दिधला
माझे रिकामेच कोंदण ,
तुळस वृन्दावानीची दिली
माझे रिकामे रिकामे अंगण
नाही दुखावले मूळ
प्राजक्त ठेविला हाती ,
काळजातील रितेपण अपार
बाप मायीची आता साथ
डवरेल माझिया दारी ,
बहर खुडूनी नेता
घर तुमचे गंधभारी
धनाची दिली पेटी
पित्याचे उदास मन ,
ओटीत घालते विहीणबाई
रूप गुणांची माझी खाण
तुमच्या पदराची सावली ,
भर्जरी शेल्याची वेलबुट्टी
जपा बनून माउली
लेकीच्या कुशीतून उद्या
वंश वेलीला लाभेल फुटवा ,
सांजेला गहिवरता लेक
माहेर तुमचेही आठवा
कधी पाझरता नेत्र तिचे
पाठीवरून फिरवा हात ,
माय - पित्याची दाटता सय
धाडा गौरीला एक रात
जपा काळजाचा माझ्या घड
विनविते जोडूनिया हात ,
सुख शांती समाधानाची
लेक माझी करेल बरसात
डोळियांच्या पंचगंगेचा महापूर
धावतो गोदामायीच्या भेटी ,
सांगा कशी विसरावी
तान्हुलीच्या
चांदण हाताची गळामिठी
~ Unknown
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)