गजऱ्याचा वेडेपणा


परवा परड्यातल्या झाडीत 
जाईची फुले वेचताना 
तू माझ्यासाठी पाठवलेला सुगंध भेटला 
तुझे श्वास घेऊन आला तो माझ्याजवळ 
म्हटलं चला …… 
मिळेल तितका सुगंध वेचू पदरात
लयीत चालणारे श्वासाचे गाणे ओळखीचे , हक्काचे होते 

ती जाईची फुलही तशी सुंदरच होती 
म्हटलं लांबसडक वेणीला दिसतील शोभून  
म्हणून त्यांना विचारलं … माळू का तुम्हाला ?

तुझा वाऱ्यावर हेंदकाळणारा सुगंध कस्सला रे चालू ????
भराभर सगळ्या फुलांवर जावून बसला 
शेवटी तो सुगंध माझ्यासाठीच होता ……. 
कित्ती कित्ती वेळा ओंजळीने हुंगले त्यांना मी सांगू ……. 

त्यांना घेऊन सगळ्या परड्यात एकटीच नाचले 
दाखवलं …… सगळ दाखवलं त्याला 
तुझ्यासाठी फुलपाखराच्या पंखावर 
जपून ठेवलेले रंग ,
मातीत लपवून ठेवलेला पावसाचा गंध 
आपल्या दोघांचा आवडता तो एकच तेजस्वी तारा 

नुकतच अंकुर फुटलेलं 
सुर्याच पाहिलं पहिल वहील किरण 
तुझ्या रात्रीसाठी जपून ठेवलेला 
ढगाआडचा भाकरी एवढा चंद्र  

पण एक सांगू ??
भारीच आगाऊ निघाला जाईचा सुगंध 
गजरा माळला वेणीत तर एक एक फुल निसटत गेल 
घरभर विखुरली सगळी वेल माझी 
आई विचारात होती …… 
"आख्ख घर दरवळतय. काय ' अहो '  नि पाठवला कि काय हा गजरा ?"
आता किती आणि कुठे कुठे गोळा करू मी तुला ?

बर ऐक ना …… 
ओंजळीने गालाजवळ आणत तुझ्या जाईला विचारलं मी 
"ए सांग ग … किती आठवण काढतो तो माझी ?" 
त्या शुभ्र पांढऱ्या फुलानाही रंग चढायला लागला 
मी ही त्या रंगात भिजवून घेतलं स्वतः ला 

आणि असेच मैफिलीचे रंग चढत असताना 
अचानक …… 
घुंगराची लय चुकावी तशी भानावर आले 
दार कुणीतरी वाजवल माझं 

इतक्या अलगद कोण ठोठावेल माझ दार ?
अरे देवा !!!!!!
नशीब , गजऱ्याचा वेडेपणा आईला नाही सांगितला मी :)

दारात चक्क तू उभा 
नेहमीप्रमाणे  , माझ्यासाठी मोगऱ्याचा , जाईचा गजरा घेऊन 
"सौ . बघ आलो मी " म्हणत गालात हसणारा 
कस सांगू रे तुला ?
एक महिना … 
एक महिना वाट पाहतेय तुझी 
३०  दिवस तुझे श्वास ह्या जाईच्या फुलात शोधले
आणि आज ते मला तुझ्या ओंजळीत सापडले   


Baby pigeon


एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडून आल्यावर काय आनंद होतो हे मला आज कळल . मी माझ्या घरी तब्बल ९ महिन्यांनी पाय ठेवला होता . 

ज्या घराला मी अक्षरशः लहानाच मोठ होताना पाहिलं .….  अगदी त्याच्या पहिल्या विटेच्या बांधकामापासून शेवटच्या रंगाच्या हातापर्यंत मी सगळ डोळ्यात साठवून ठेवून पाहत आले , ते घर मला माझ्या कुटुंबाइतकच प्रिय आहे . आपल्या घरी राहायचा आनंद काही निराळाच असतो . ते घर सोडताना अगदी जीवावर आलं होत माझ्या . घराला कुलूप लावतान तर अस वाटत होत …… जा सगळे कुठेही , राहीन मी एकटी , माझ्या घराच्या सोबतीला . पण नाही . घरापेक्षा अजून कोणालातरी माझ्या सोबतीची जास्त गरज होती . आणि सगळ मनात साठवून , हुंदक्यांचे झरे गळ्यातच आटवून मी ही निघून गेले जर्मनीला . 

अजूनही तो दिवस आठवतो मला . गाडीत बसले तरी निदान एक ४ -५ वेळा तरी मी मागे वळून पाहिलं असेल. माझ्या घराच्या खिडकीचा शेवटचा कोपरा दिसेतोवर मी पहात होते . :) घराचे मला होतेच समजावत "अग …तुझच आहे घर . पळून का जाणार आहे ? परत येशील तेव्हा राहा निवांत " . मी तरी काय सांगणार कोणाला . लहान मुलासारखी अवस्था झाली होती माझी . अहो …. तिथे राहीन अजून मनही न्हवत भरल माझ. आणि वाईट फक्त याचच वाटत होत कि माझ घर आता एकट असणार . आता मी , माझ बाळ , अहो इथे कुणीच नसणार त्याला सोबत म्हणून :(

गेल्या ९ महिन्यात मी अहो ना  ९०० वेळा म्हणून झाल असेल . "घरी कुणीच नाही राहत हो , जाऊ न आपल्या घरी . मन नाही भारल माझ अजून मला तेच घर आवडत . एकट असेल हो ते "  . तेव्हा ते ही माझी समजूत काढायचे "बाळ , वेडी आहेस का तू ? इथे तू , मी , पिल्ला राहतो ना , मग हे ही आपलच घर ना . इंडिया असो वा जर्मनी . काय फरक पडतो ". :) पण मला पडायचा … फार फार फरक पडायचा. 

इथे किचन कट्टा साफ करायला घेतला की वाटायचं माझ्या त्या घरी कट्ट्यावर धूळ जमली असेल फार . देव्हाऱ्यातल्या बाळकृष्णाला कोण घालत असेल रोज तुळस ? का तुळसही सुकली असेल माझी ? आणि रांगोळी ……. येताना काढली होती दारात , पुसालीही असेल आत्तापर्यंत. दिवाळीला सगळ्याच्या घराला आकाशकंदील लटकावले असतील , दिव्यांनी सजली असतील सगळी घर आणि फक्त माझ्याच घरी अंधार असेल . कसं वाटत असेल माझ्या घराला ? हे आणि असे बरेच बालीश प्रश डोक्यात फिरत राहायचे

इतके दिवस प्रतीक्षेत गेल्यावर शेवटी माझं इंडियाला थोडे दिवस मुक्कामाच नक्की ठरलं . भावाच लग्न न्हवत चुकवायच मला आणि घर ही वाट पाहत होत माझ 

एअरपोर्ट ते लग्नघर हे वेळापत्रक इतकं टाइट असूनही मी माझी गाडी पुण्यात वळवली . २ दिवसांच्या सलग प्रवासाने मी आणि पिल्ला दोघेही पार थकून गेलो होतो . पण थोड्या वेळासाठी का होईना माझ्या घरी मी थांबणार म्हटल्यावर माझा सगळा क्षीण कुठल्याकुठे निघून गेला . अर्धा तास जरी थांबले घरी तरी भावाच्या लग्नात मिरवायला शक्ती मिळेल माहित होत मला :)

गाडी पार्किंग मध्ये थांबली तशी मी कोणाचीही वाट न पाहता पिल्लाला घेऊन धावत घराकडे गेले . एक एक पाऊल टाकताना मनात सारख वाटत होत ……… ९ महिने नाही उघडल मी घर , कस असेल ? मी ठेवून गेली होते तसच कि थोड धुळीने रंगल असेल ? कुणीच नसेल न इतके दिवस त्याला बरोबर ? एकट राहील माझ घर इतके दिवस (हो …… मी आहे फार भावूक माझ्या घराबद्दल , काय करणार ?)

अगदी अधाशाप्रमाणे कुलूप उघडल आणि पाहिलं पाऊल आत टाकायच्या आताच काहीतरी वेगळ जाणवलं मला .कुणाचातरी एक नाजूक आवाज झाला .  माझ घर एकट नाहीये. मी नाही मग कोण आहे घरी ? धुळीत माझ्या बाळकृष्णाची पावलं उठवत मी सगळ घर शोधून पाहिलं . कुणीच न्हवत पण हिरमोड नाही झाला माझा . जाणवत होत , कुणीतरी आहे इथे . कुणाचातरी आवाज झाला दार उघडल्याबरोबर . 

माझी नजर चहूबाजूंनी भिरभिर फिरत होती . तोवर पिल्लाचा आवाज आला . "Mamma , Come here . baby pigeon"    आणि मी धावत गेले . माझ्या पिल्लाला मी इतक आनंदी कधीही पाहील न्हवत . त्याचे इटुकले डोळे विस्फारून तो कबुतराच्या पिल्लांना पाहत होता . माझ्या स्वयंपाक कट्ट्याच्या वरच्या बाजूला या कबुतरांनी आपला छोटासा संसार थाटला होता . आणि त्यात त्यांची दोन दिवसांची २ गोंडस पिल्ली . :) मला काहीच सुचेना . माझ्या पिल्लाला जवळ घेऊन मी नुसतीच हसत होते नी डोळ्यातून आनंदाश्रू :)

किती आणि कसे आभार मानू त्या कबुतरांचे मलाच कळेना . माझ घर मी नसतानाही जिवंत ठेवल त्यांनी . संसार केला , नवीन पाहुणे आणले घरी :) माझ्या घरी :) माझ घर एकट आहे ही मला वाटणारी खंत निष्कारण होती . एकट न्हवतच ते कधी . आम्ही नाही राहिलो पण त्या कबुतराच कुटुंब होत न इथे रहायला :) आपल्या कुणालातरी आपण एकट नाही सोडून आलो हे समाधान फार मोठ वाटल मला त्या क्षणी . 

घराच्या exhaust fan च्या फटीतून आत येउन या कबुतराने आमच घर निवडल होत , त्याच्या पिल्लांसाठी :) काही क्षणात बरीच चित्र डोळ्यासमोरून पुढे सरकत होती . त्यांनी दिवसरात्र मेहनत केली असेल घरट्यासाठी , जशी आम्ही दोघांनी केली तशी . आपल्या गुटूरर…… गुटूरर……  आवाजाने पहाटे जाग केल असेल घराला माझ्या . आम्हा दोघांसारखे हे ही एकत्र जेवले असतील कधीतरी माझ्या घरी . घरावर विश्वास ठेवून रात्री निवांत झोपही काढली असेल . ओसंडून प्रेमही केल असेल एकमेकांवर…… आमच्यासारख , कदाचित त्याही पेक्षा जास्त :)

घरी पिल्लांच आगमन झाल्यावर पिल्लाच्या बाबालाही तितकाच आनंद झाला असेल जितका आमच्या बाळाला ऑपरेशन थियटरमध्ये  डॉक्टरने  ह्यांच्या हातात दिल्यावर त्यांना झाला होता . पिल्लाच्या चिवचिवाटाने माझ घर पुन्हा भरून गेल असेल . आर्यही असाच घरभर खेळायचा आणि त्याच्या पायातील तोडे वाळ्याच्या , घुंगराच्या आवाजाने माझ घर भरून जायचं  . ते हि त्याच्याबरोबर लहान व्ह्यायचं. पाहिलं पाऊल टाकताना त्या भिंतीनीच तर दिला त्याला आधार :)

कबुतराच्या आनंदात मी सगळ घर साफ केल . त्यांच्या संसाराच्या काही कट्या खाली पडल्या होत्या . त्या सावरून ठेवल्या . बाकी आमच्या आवरून ठेवल्या :) पण घरट हलवायला मन होईना . २ दिवसांची पिल्ली . कशी राहतील बाहेर ? कुठे राहतील ?  असतील कि नाही मी काढाल बाहेर तर ? माझ घर पुन्हा एकट होईल . हे आणि असे  विचार . तेवढ्यात माझ्या पिल्लाने माझं कोड सोडवलं  "Mumma, राहू दे त्यांना इथे " :) आता तर पिल्लाचही मन मोडायला होईना . घरी सगळ्यांना समजावून मी त्या कबुतरांना अजून थोडे दिवस देवून टाकल माझ घर . काय होईलअजून एकदा स्वच्छ कराव लागेल मला , करू की त्यात काय :) 

आणि कबुतरांच्या पिल्लांना आमचा त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेत , थोडाही गलका न करता , अगदी समाधानाने घराबाहेर पडले . माझ घर आता एकट न्हवत . :) आणि भावाच्या लग्नाचा मुहूर्तही होताच ना गाठायचा :) अजून एका नव्या संसाराची साक्षीदार बनायला निघाले होते मी . 

कुलूप लावता लावताच ह्यांना call केला . जे मनात होत ते सगळ एका श्वासात बोलून टाकल . शांतपणे ऐकून झाल्यावर ते एवढंच बोलले "वेडी आहेस तू . तुझ घर कधीच एकट न्हवत . रोज आठवण काढतेस न तू न चुकता . राहू दे त्या कबुतरांना घरी आपल्या. तू आहेस ना खुष मग झाल तर . मला अजून काय हवंय :)"

माझं घर आज मी एकट टाकून न्हवते जात :)

View Facebook Comments


इथे जन्मते कविता



त्याच जगण असह्य करणारा
आजूबाजूला जबरदस्ती रेंगाळणारा
तिचा तो किरकिरी आवाज
कधीतरी कंटाळून दूर लोटला
की ती त्याच्या ओंजळीत मागायची हुंदक्यांच दान
पावसासारखी कोसळणारी तिची असावं
अन निळ्या जांभळ्या डोळ्यातली शाई मिसळून
शुभ्र कोऱ्या कागदावर जन्म घ्यायची
तिची "तू जवळ नसताना " सारखी सरलेल्या दिवसांची कविता

त्याच पावित्र्य हिरावू पाहणारा
रोज नवी कारण घेऊन , दुरावूनही लपेटून बसणारा
तिचा तो नकोस वाटणारा स्पर्श
कधीतरी रागारागाने भिरकवला हात
की ती आठवण करून द्यायची मनगटावरच्या धाग्याची
सगळ्या सीमा मोडू पाहणारी तिची मैत्री
अन त्याच्या डोळ्यातला नेहमीचा कोरडेपणा मिसळून
वहीच्या शेवटच्या पानावर चोरून उमलायची
तिची " कस जगायचं ….तुच सांग " सारखी नात्यांच्या गुंत्याची कविता

त्याची नको इतकी धांदल उडवणारा
कितीही सावरला तरी पसरून बसणारा
तिचा तो लहरी स्वभाव
कधीतरी वैतागून नाहीच काढला राग
की ती तोलायला सुरु करायची समजुतदारपणा त्याचा
अकारण वाहवत जाणारी अखंड बडबड तिची
अन त्याचा शांत जलाशयाचा निश्चल चेहरा मिसळून
कट्ट्यावरच्या भुट्ट्यासहित पायदळी हरवायची  
तिची "हे अस नसत रे … " सारखी तक्रारीची कविता

त्याला नेहमीच कंटाळवाणी वाटणारी
कितीही टाळल तरी समोर येउन बसणारी
तिची ती कवितांची चळ
तिच हे सगळ वाचण अखंड चालू असायचं
तिच्या शब्दाचे झरे , त्याच्या डोळ्यासमोर कोरडेपणे वाहायचे
अक्षर घुसायची कानात फक्त अन अर्थ पानावरच राहायचे
कधीतरी न राहवून केले त्या पानाचेही कपटे

त्याने वाचण सोडून दिलंय
तसं तिनेही लिहायचं सोडलं
वाऱ्यावर भिरभिरत राहतात शब्द , शाई घरभर सांडते
कागदाचे तुकडे आठवून ती मग स्वतःशीच भांडते
काळीज भळभळत
हात थरथरतो
वाढायला लागत मस्तकवरच्या
रागीट शिरेच बांडगुळ
पण कविता आता इथे जन्मत नाही

View Facebook Comments


चिमुकला जीव




घरभर खेळणी पसरलेली असतात माझ्या
नीटनेटका नसतोच कुठला कोपरा
हाताचे ठसे , A B C D , नारळाच झाड आणि बरंच काही
भिंतीचा फळाही पडतोय अपुरा
बाबाचे शूज घालून घरभर धावण
आईची लिपस्टिक कपाळावर लावण
२ मिनिट बाप्पासारखा शांत बस जरा
चिमुकला जीव आता दमवतोय खरा :)


स्टंट करत बेडच्या चालतो आता काठावरून
चिउताईच्या घासासाठी आईला रोज उठवतो ताटावरून
papmpers चा ढीग रचून तयार केलेली शिडी
कशी विसरू बाबाच्या पोटावर मारलेली उडी ?
ई-लार्निंग चे धडे गिरवतोय आत्तापासून
लाठी-काठी शिकलाय Skype समोर बसून    
(मामाने शिकवलंय ह हे सगळ आम्हाला …… कोल्हापुरात नसलो म्हणून काय झाल ?)
शेजारणीच्या डोअर बेलवर सारख्या याच्या नजरा
चिमुकला जीव आता दमवतोय खरा :)

Fecebook , YouTube तर नाचतंय हाताच्या बोटांवर
Nursery rhymes ही पक्के बसलेत या छोट्याश्या ओठांवर
फोनवरून विक्स ही फासल आम्ही काकाच्या नाकाला
( त्यानंतर आईच्या फोनला झालेली सर्दी बरीच झाली नाही :P )
कोण शिकवत हे सगळ माझ्या लेकाला ?
इवालाल्या फुलपाखराला ओंजळीने देत राहतो सावली
तळ्याकाठच्या बदकासाठी स्वारी स्वेटर घेऊन धावली
आत्ता वाटतय , माझा रांगणारा बाळकृष्णच बारा
चिमुकला जीव आता दमवतोय खरा :)


When every leaf is a flower


एका निःशब्द पायवाटेवरून
बोचऱ्या थंडीशी हातमिळवणी करत
ढगाआडून डोकावणारा एक सूर्यकिरण शोधायला
नजर वर करावी
अन
एखाद पिकलं पान गळून अंगावर पडाव

सो-सो करणारी वाऱ्याची एक झुळूक
अन
झोपळ्यावर झुलणाऱ्या पोरासारख
एकेक पान भिरभिरत उडायला लागत
लाल पिवळ्या रंगांच्या सूर्यकिरणानी स्वतःला नटवून  

वाटत … हे पानांचं आणि वाऱ्याच संभाषण मला का नाही आलं ऐकू ?

म्हणाला असेल वारा ….

"पिकल्या पानांनो ……

काय झाली थंडी पडली म्हणून
सोनेरी लाल स्वेटर देतो न मी आणून

असं कसं कुणी घरातून नाही बाहेर पडत
सजवू ना रस्ता आपण , पानाला पान जोडत "

अन या वाऱ्याच्या एका विनंतीवर
एका मागोमाग एक सगळीच्या सगळी पान गळायला सुरु झाली
जणू काही ……
ती मातीच्या प्रेमात पडली होती
इतक्या दिवसांचा देठाशी असलेला बंध तोडून
आवेगान रस्त्याशी लोळण घ्यायला तयार :)
जस काही
Fall is falling in love with the ground

महिन्यापूर्वी हिरवीगार दिसणारी झाडं
त्यांच्या तर नुसत्या रिकाम्या फांद्याच राहिल्या आता

आणि त्या खालची जमीन ……
तो तर बिछाना झालाय
बर्फाची पांढरी शुभ्र मऊशार रजई अंगावर ओढून घ्यायला तयार :)

आश्चर्य फक्त याचंच वाटतंय ……
पानगळ ही इतकी देखणी आणि सुरेख असू शकते ?

इथं प्रत्येक पिकल्या पानच आज फुल झालंय :)

शिंग फुटली का ?

काही दिवसांपूर्वी हाउसवाईफ ही पोस्ट लिहिली होती . तशी मलाही आवडली होती हि पोस्ट फार. म्हटलं करावी पब्लिश एखाद्या सोशल नेटवर्क साईट वर (जाणून बुजून नाव घेण टाळल . बाकी तुम्ही सुज्ञ आहात :))

हे कसं लिहिलंय , आवडलं कि नाही हे सांगायला बऱ्याच लोकांचे मेसेज आले . अगदी अनपेक्षितपणे . आणि सगळ्यांच शेवटच वाक्य "काय झालाय ग ? ठीक आहे ना सगळ ? काही बिनसलय का ? कि काही वाद झालेत "
आता यावर मी काय बोलणार … एवढंच सांगितलं "हा माझा ब्लॉग आहे . आत्मचरित्र न्हवे . माझी लिहिण्याची हौस भागवते इथे मी " :) असो …… हे सगळ सांगण्याच कारण एकच. आजची पोस्ट वाचून कुणी विचारू नये "काय झालाय ग …… " :D

" शिंग फुटली आहेत तुला " बऱ्याच दिवसांनी हे वाक्य ऐकायला मिळाल परवा . आणि त्यावरून हे सगळ सुचल.

लहान असताना आजीच्या तपकीरीला एकदा ' नाही ' म्हटलं . चिडली न माझ्यावर . थोड्या चेष्टेच्या स्वरात म्हणालो 'वाकलीस ग …. वाकलीस कमरेत आता . पावसाळा आहे . ढगाला चीर पडलीये . बघ स्वर्गाच दार चुकून उघड असेल . घाई कर जरा ' त्या दिवशी तिने मला माझ्या नवीन अवयवाची ओळख करून दिली . " शिंग फुटली का ? "

थोडी मोठी झाले म्हणजे खुट्ट्यातून वर येईन इतकीच . अभ्यासाच्या ओझ्याने वाकून जीव मेटाकुटीला आला होता . ' नाही करणार आज अभ्यास ' इतक्या सभ्यपणे सांगितलं असत तर बाबा थोडीच ऐकून घेतले  असते शांतपणे ?  म्हणून हळूच विचारलं 'बाबा …… हा प्रोग्राम संपल्यावर करू ?' आणि आजीच वाक्य परत ऐकायला मिळाल " शिंग फुटली का ? "

अशीच शिंग मोजत शाळा संपली . कॉलेज लाईफ सुरु झाल . रोजच नटण मुरडण आई कपाळाला आठ्या पडून बघायची . नाटकाच्या तयारीमुळे रात्री घरी यायला उशीर होणार . बिचारी उगाच काळजी करत बसेल म्हणून आपल चुकून बोलले …. येईल ग कुणीतरी सोडायला नाहीतर राहू कोणाच्यातरी रूम वर …. हो कुठून  बुद्धी सुचली आणि बोलले अस वाटल. काय होणार ……. पंचारती , करंड्या भरून फुल पडली अंगावर " शिंग फुटली का ? " हे परत एकदा ऐकल्यावर खरच डोक्यावर हात फिरवून पहिला :)  डोक्यावर दोन शिंग आणि त्याला लाल गोंडे लावलेत फितीचे अस काहीतरी डोळ्यासमोर यायला लागलं

झाल …लग्न झालं तेव्हा वाटल ही शिंग आतातरी पाठ सोडतील . नवरा तरी ही पदवी देणार नाही . नाही आपल्याच पायावर दगड कोण मारून घेईल हो ? पण कुठल काय . हे सगळ पाचवीला पुजाल्यासारख वाटतंय .  २५ वर्ष माहेरी एकत्र कुटुंबात काढल्यावर एकट राहण अवघड जाणारच हो थोड . रविवार संपूच नये असा वाटायचं . काय करणार बडबड करायची सवय नडली आमची . इथे बोलायला कुणी नाही म्हटल्यावर जीव घुसमटतो . घड्याळाच्या ठोक्याकडे बघत कसाबसा दिवस संपतो . पण नवरदेवांच आपल रविवारीही काम चालूच . असहकार दाखवायचा एक प्रयत्न आणि परत ती शिंग वर डोक काढून उभी राहिली " शिंग फुटली का ?"   :)

आता कोण समजावणार …. शिंग नाही हो फुटली … एकटेपणाने उन्मळून पडलंय सगळ भोवातालच जग.

कसय …… आई , बाबा आजीने हे म्हटल्यावर इतक बोचत नाही हो  

अजून तुझा विश्वास नाही


पाठीवरची नितळ कांती
स्कार्फने तरी ठेव झाकून
निदान मार्करचा तरी ठिपका लाव
दोन भुवयांमध्ये चुकून

भांगातल्या कुंकवालाच
असतो खरा देखणेपणा
पॉईंट हीलच्या नादात
तिरपा झालाय बघ तुझा कणा

कशी येईल आय - लायनरला
आजीने पडलेल्या काजळाची सर
चेहरा म्हणजे न्हवे पेंटिंग बुक
अग मेकउप थोडा कमी कर  

नखं खराब होतील म्हणून
म्हणे नाहीस निवडत मेथी
आणि सूर्याशी तर तुझं कट्टर वैर
स्किन tan व्ह्यायची भिती

मनापासून सांगतोय  .......

बाईक वरून फिरवतील मित्र
पण आईशी ओळख नाही देणार करून
बायको त्यांना "साडीतली सुगरण" च लागते
जरी बसले तुला व्हालेनटाईन डे ला घेरून

सौंदर्य तुझ राखून ठेव
मला त्याची आस नाही
पूर्ण कपड्यातच मुलगी सुंदर दिसते
यावर अजून तुझा विश्वास नाही

View Facebook Comments


पत्रास कारण की ….


पत्रास कारण की …. 

सकाळपासून कोसळतोय नुसता धो धो 
तुझ्यासारखाच …… अचानक बरसायची सवयच त्याचीही  

थोडस भिजून घ्यावं म्हणून बाहेर गेले आणि बंद झाला 
तु ही असाच शांत व्हायाचास , मी दिसल्यावर 

म्हटलं , आलेच आहे बाहेर तर थोडे पाय रिकामे करावेत 
आता थांबलाच आहेस तर कशाला लागते छत्री 
आणि पुन्हा तुझ्यासारखाच तो ही कोपऱ्यावरून मागे फिरला 
तू मला विसरलीस कशी …. याची आठवण करून द्यायला

चिंब भिजायला ठरवून थोडीच बाहेर पडत कुणी ?
सगळ अस न ठरवताच घडत गेल …… आपल्या नात्यासारख 

भिजलेल्या अंगाला मग रस्त्याकडेची पानगळ येवून चिकटली 
हल्ली तुझ्या आठवणी ही अशाच बिलगतात रे …. 
वाळलेली पान जास्त आवाज करतात ते त्यांना बाजूला करायला गेल की लक्षात  येत 
आठवणींच ही तच काहीस , नो एन्ट्री चा बोर्ड दिसला की पहिल्या रांगेत येउन बसतात :)

आता म्हटलं जाव घरी , बराच उशीर फिरले थेंबाबरोबर
अचानक वाऱ्याचा वेग वाढला 
कुठल्या रस्त्याने जावं घरी काहीच सुचेना 
तू ही असाच ……  पुढे यायचास आवेगाने , वाट अडवायला माझी :)

कित्ती वेळा अडवली असशील रे माझी वाट ?
काहीच हिशोब नाही लागत त्याचा आणि या बरसणाऱ्या थेम्बांचाही
खरच मोजायला सुरवात करायची की भिजायचं तुझ्यात मनसोक्त 
आजही ठरवता नाही आल मला 

कशीबशी पोहोचले घरी , परत लोकांची नजर चुकवत
नाही … परत म्हणतील "हे काय वय आहे हे सगळ करण्याच ?"
चिंब भिजायला वयाची नाही तरुण मनाची गरज असते 
पावसातही आणि प्रेमातही 
नाही रे कळल अजूनही यांना 
असो …. 

आता काय, मस्त गरमा गरम अल्ल्याचा चहा 
तुझ्या श्वासासारख्या …. चहाच्या वाफाही रेंगाळतात गालांवर 

आता जरा बर वाटतंय …… 

थंडी नाही गेली अंगातली 
पण ……. मनमुराद भिजल्याचा आनंद 
आणि तो ही असा अचानक , न ठरवता 
रस्ता क्रॉस करताना तू दिसलास परवा … 
तेव्हा झाला ना अगदी तसाच 

बाकी अजूनही ठरल्याप्रमाणे 
तू तुझी वाट माझ्यासाठी वाकडी केली नाहीस 
आणि मी …… तु घालून दिलेली रेष ओलांडायची नाही म्हणून अजून तिथेच 
तुझ्या वाटेला कुठे वळण लागतय का …. आपल्या घरी येणार ?
याची वाट पहात :)
थांबेन …… थांबेन मी 

माहित आहे मला 
तू परतून येणार 
आजच्या पावसा सारखाच, कोपर्यावरून 
मी फिरायला बाहेर पडलेय हे कळल की :)

बाकी ठीक ……. छान चालू आहे सगळ 

अर्रे थांब , एक सांगायचं राहिलच बघ परत
माती चीप्प भिजली होती पावसाने …
पण हल्ली तिन दरवळायचं सोडून दिलंय :)      



देव बसलेत

हो …. म्हणे देव बसलेत

पण हे देव का बसलेत ? कशासाठी ? घटस्थापना म्हणजे काय ?
आत्ता तुम्ही म्हणाल … घटस्थापना म्हणजे इतक काय अवघड आहे सांगायला ?

आईने शेतातून आणलेली २ दिवस चांगली वळवलेली काळी माती मडक्याभोवती गोळा करून रचायची आणि सगळी धान्य त्यात थोडी थोडी पेरायची …. झाल

अगदी बरोबर …. हेच करायचं . पण हे सगळ काय माहीत आहे ?


हे म्हणजे बळीराजाने धरणीमातेला घातलेलं साकड . काळ्या मातीत धान्य पेरून तो ९ दिवस वाट पाहतो कौल द्यायची . आता हा कौल वगैरे प्रकार कोकणात जास्त चालतो . माझ सासर कोकणातलं त्यामुळे हे सगळ मी पाहिलंय .

कौल मागायचा झालाच तर कोकणात एक प्रथा आहे . चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून मंदिरात जायचं, आपल म्हणन पुजाऱ्याना सांगायचं मग पुजारी देवासमोर गाऱ्हाण मांडतो . मोठ्या आवाजात . जे काही असेल ते देवाच्या कानावर घालायचं . पुजाऱ्याकरवे .
कोकणी म्हणजे साधी माणस हो . पोटात एक अन ओठात एक नाही जमत त्यांना . नवस बोलायचं ते ही गावात सगळ्यांसमोर गाऱ्हाण मांडून हेच त्यांना माहीत . म्हणजे हे असं

रे म्हाराज्या ! बारा वहिवटीच्या म्हाराज्या !!
बा म्हाराजा रवळनाथा
आम्ही आज गाऱ्हाण घालतो . ता ध्यानात ठेव म्हाराजा !

हे देवा , ह्या दोन लेकरांचा नवा संसार उभा कर !
आमच्या ह्या गोतावळ्याक या नवीन पोरीक सुखी ठेव !
हेंची सदैव भरभराट होऊ दे !
तेंका उदंड आयुष दी !
ह्या जोडप्याक सुखी ठेव !
वेलिक लवकर फुल येवाक पाहिजे !
 असा आमचा तुका हात जोडून सांगणा !

शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास,
किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास ,
किंवा,  तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास,
किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास,  आमका सगळ्याक, क्षमा कर.

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या,  तुका अखेरचा सांगणा !

 हे म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा कुलदैवतास गेल्यावर माझ्या दिराने पुजाऱ्याकरवी आम्हा दोघांसाठी घातलेलं गाऱ्हाण :)
आणि पुजार्याच्या प्रत्येक वाक्यानंतर "व्हय म्हाराजा !" म्हणत स्वतःच्या समत्तीची जाहीर कबूलही द्यावी लागते

बाकी मूळ मुद्दा काय …. घटस्थापना म्हणजे एक गाऱ्हाणंच

सगळी धान्य घटात पेरून शेतकरी देवाच्या म्हणजे निसर्गाच्या कौलाची वाट पाहत ९ दिवस गाऱ्हाणं ऐकवतो .

" हे धरणीमाते ,
या वर्षी ज्या धान्याला वातावरण पोषक असेल ते धान्य घटात भरभरून येऊ दे
त्यानेच मी माझी जमीन पेरेन "

दिवस जसजसे पुढे सरकतील तसतशी हिरवी पाती घाटातून डोकावायला सुरु होतात आणि एखादाच कोंब सगळ्यात जास्त उंच वाढतो . हाच तो कौल निसर्गाचा :)

देवांना खाऊच्या पानावर बसवायचं आणि ९ दिवस निवांत वेळ द्यायचा .  मग जो काही त्या घटाचा कौल तीच पेरण करायची या वर्षीही . अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून :)

म्हणे नवरात्र संपल्याशिवाय लग्नाची बोलणीही करत नाहीत . आता का ? तर हे अस …… financially आपण पुढच्या वर्षभरात किती stable असू त्यावर लग्नाचा खर्च अवलंबून …… बरोबर कि नाही ? मग पेरणी कुठली करायची यावर सुनेला किती दागिने घालायचे हे ठरवायचं :P

बाकी देवी आहेच आपल्यापाठी …… शक्ती द्यायला :)

सर्वाना नवरात्रीच्या शुभेच्छा :)

बाबा कधीच मोठे होत नाहीत

आज हे सगळ सुचण्याच कारण म्हणजे बाबांचा वाढदिवस . तसं दरवर्षी केक वैगरे नाही कापत बाबा पण घरी एक मस्त वातावरण असत . त्यात भरीला भर म्हणजे संध्याकाळची बाबांच्या आवडीची आईच्या हातची बासुंदी :)

आता हे बासुंदी प्रकरण माझ्या घरच्यांनाच माहित आहे . आणि आमच्या लग्नानंतर माझ्या 'श्री' ना माहित झालय :). असो……  आता हे बा . सुं . दी . म्हणजे नक्की काय हे मी तुम्हा सगळ्यांना सांगितल तर माझ्या बाबांचा पुढच्या मिनिटाला फोन येईल "अमू …. काय हे ? …… " त्यामुळे क्षमस्व . बासुंदी इथेच संपवत आहे :)





बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


डॉक्टर काकांकडून बाळ विकत आणायला खाऊचे पैसे भिशीत साठवणारी मी आणि भिशी इतक्यात भरू नये म्हणून रोज माझ्या नकळत माझ्या भिशितला १  रुपया काढून घेणारे बाबा :)

आईने सांगितल्याप्रमाणे मला इतकच माहित होत की बाळ डॉक्टर काकांकडे विकत मिळत . आणि नेमकी मी त्यांच्याकडे गेले की  त्यांच्या फ्रीजमधली सगळी बाळ संपलेली असायची :P

बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


"बाबा कुठ गेले ?" हे माझ पाहिलं वहिल वाक्य ऐकून पळत येउन मारलेली मिठी . जेमतेम ९ महिन्यांची असेन मी . पण आठवतंय हे सगळ मला


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


रुमालाची घडी करून तयार केलेली बेडकी .  बँकेमधून यायला रोज कितीही उशीर झाला तरी माझ्याशी रुमालाच्या बेडकीने मनसोक्त खेळणारे बाबा आणि त्यानंतरच ते वाडीलालच आईस्क्रीम :)  " तुमची मुलगी वाडीलाल सोडून दुसर कुठलच आईस्क्रीम खात नाही " अस कितीतरीवेळा ऐकून घ्यावं लागलाय त्यांना माझ्यामुळे    

   
बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……

चौथीच्या स्कॉलरशीपच्या वेळी खाल्लेला ओरडा "किती करशील अभ्यास ? जा …. खेळून ये जा थोडा वेळ " आणि मुलगी नंबरात आली म्हणून त्यांनीच देवासमोर ठेवलेला तो पेढ्याचा पुडा


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


माझी अंगठ्यांनी भरलेली आठही बोट . पोरीला सोन्याची हौस म्हणून वार्षिक निकालाच्या आदल्या दिवशीच माझी नवीन अंगठी तयार असायची . आणि त्याच हौसेने बहुदा मी शाळेतला नंबर सोडला नसावा :)


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


"इंजिनीअरिंग ला अडमिशन हव असेल तर स्वतः मार्क मिळावा बर …… " हे अगदी कुठल्याही मुलीला कौतुक वाटावं असं वाक्य  आणि  इंजिनीअरिंगच्या पहिल्या दिवशीचा त्यांचा तो सल्ला "४० मार्क मिळाव आणि हसत खेळत शिक . फार त्रास नको करून घेऊ :)" मला आठवतंय तितकं मी बाबांचा न ऐकलेला हा एकच सल्ला असावा . बाकी इतर वेळी ते म्हणतील ती पूर्व


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


लग्नाच्या दिवशी उंबरा ओलांडताना मारलेली मिठी.  "पोरीला सांभाळा" हे सांगणारा ओला आवाज


आणि बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


नातवाशी म्हणजे माझ्या पिल्लाशी त्याच बेडकीच्या रुमालाने खेळणारे आजोबा . त्याच गोष्टी सांगणारे , तीच अंगाई २५ वर्षांनी तितक्याच सुरात म्हणणारे  माझे बाबा :)


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……

जावयांच्या "बाबा …. आज काय स्पेशल ?" या प्रश्नावर त्याचं ते चिरतरुण उत्तर " बा सुं दी ……… "

मी मोठी झाले , लग्न झाल , बाळ झालं पण सगळ अजून तसच आहे . मुलं मोठी होतात बाबा कधीच मोठे होत नाहीत :)


View Facebook Comments 

आई …. देवाघरी गेलीये


एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

पोरीच्या लांबसडक केसांची अंघोळ राहिलीये रीठ्याची
बघ …पुरण राहिलंय अजून , फक्त पूजाच केलीये पाट्याची
ह्यांच्या पिवळ्या सदऱ्याच परवा तुटलंय म्हणे बटन
शेजारच्या सखुला ही सांगितलय उद्या तिला देईन  मटण
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

धाकटा सकाळीच मागत होता खोबऱ्याची वडी
ताईने घेतलेल्या साडीची मोडलीही नाही मी अजून घडी
शाळेतून आल्यावर पोर हंबरडा फोडील रे
उद्या पासून आई नाही , कुशीत घेऊन एकदा समजाऊ दे
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

तिकटीवरच्या आजीची वाटी राहिलीये द्यायची परत
गोठ्यातली गायसुद्धा नाही माझ्याशिवाय चरत
पोरीला फक्त लग्न करून सासरी पाठवते
शेवटचीच तिला एकदा मनासारखी नटवते
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

दिराचे हात पिवळे करून अजून जाऊ पण नाही आणली घरी
मी गेल्यावर चूल सांभाळणारी सुगरण असलेली बरी
 कामावरून परत आल्यावर आल्ल्याचा चहा लागतो रे ह्यांना
"सांभाळून रहा " म्हणून सांगून तरी येते त्यांना
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

पिल्लू बघ रे कधीच … दुधासाठी रडतंय
प्रत्येकजण आज कसं त्याच्यावर इतक  चिडतय
तुळशीतल्या दिव्याची वात ही संपत आलीये
पिळूच्या पिशवीची शोधाशोध सुरु झालीये
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

पुन्हा येईन येईन परतून मी , काळजी नको करू
एकदा आत झोपवून येते तिला , उंबऱ्यात वाट बघत बसलय लेकरू
संसार एकट्यान ओढायची नवऱ्याला ताकद देऊन येते
अर्ध्यावरच सोडून आलीये …… थोड आवरून तरी घेते
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

View Facebook Comments


आलीस का गौराबाई, आले गं बाई

सखू आणि चिऊ …. दोघी मायलेकी . देवाने जणू त्यांना एकमेकीसाठीच बनवलं होत. आता चिऊच लग्न झालय पण म्हणून काय झाल ? सखू साठी ती अजूनही आंब्याच्या लोणच्यासाठी स्वयंपाक कट्ट्यावर चढणारी तिची नाजूक परीच आहे . :) मुलं मोठी होतात पण आई नाही होत कधी मोठी……. असो 

आज हे सगळ आठवायचं कारण म्हणजे गौराबाई … गणपती उत्सवातील हा तिसरा दिवस . गौरी आल्या न आज घरी . 

सखूची गौराई मात्र राहिली यावेळी लांब . काय करणार ? सप्तपदीवेळी वचन दिल्याप्रमाणे चिऊला जावच लागलं नवऱ्याबरोबर , तो नेईल तिकडे … अहो चिऊ गेली परदेशी तिच्या नवऱ्याबरोबर तिच्या पिल्लाला घेऊन . झाले आता त्याला ६ महिने पूर्ण होतील . 

तसं पाहिलं तर रोजच सखू कासावीस व्ह्यायची नातवाच्या आणि मुलीच्या आठवणीने पण आज तिला राहवतच न्हवत . घरची गौराई म्हटलं की सखुला तिची गौराई ….  चिऊच येते समोर . आणि का नाही येणार ? पोरगीला गौरीचा खेळ खेळायची हौस म्हणून चिऊला चालायला यायला लागल्यापासून सखूने तिच्या अंगणात डाव मांडला . पोर पण खेळायचीच हो अगदी अंगात भिनल्यासारखी. पन्नास एक गाणी तोंडपाठ असतील तिला . तिने झिम्मा धरला कि नाहीच तुटायचं तासतासभर . अशी  एकामागोमाग सांगायची गाणी ती . केवड्यातल्या नागासारखी तिची लांबसडक वेणी घागर घुमावाताना कुठल्या कुठे जायची तिलाही भान नसायचं. हौसेन नऊवारी नेसून खऱ्याखुऱ्या गौरीसारखी नटायची .  पाटील काका नेहमी म्हणायचे "सुनबाई …. पोरीला नजर लागेल हो कोणाचीतरी " पण आजी लावायची ना काजळाचा टिळा कानामागे    

लोकं म्हणतात हे गौरीचे खेळ वगैरे सगळे खेडवळ प्रकार . पण त्या लोकांच्या नाकावर टिच्चून चिऊ सगळ्या वाडीचा कौतुकाचा विषय होती . आई बाबांच्या मनासारखी पोरगी खूप शिकली . laptop च्या keyboard वर जितक्या लयीत तिची बोट चालायची त्यापेक्ष्या जास्त गौरीचा भानुरा वाजवताना हलायची  (भानुरा म्हणजे परात पालथी घालून रवीने वाजवत गौरीचे कान उघडायला ) जितक्या आवडीने जीन्स घालायची तितक्याच आवडीने नाकात नथ ही घालायची सणाला . गौरी घरात घेताना आईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना तो नथेचा मोती नेहमीच टोचायचा तिला  

सखू  विचारायची "कशावरून आली ?"
चिऊच आपलं नेहमीच उत्तर " हत्तीवरून " लक्ष्मी येते ना हत्तीवरून म्हणून …… मनात म्हणायची माझ्या बाबांच्या घराचा उंबरा सोन्याचा होऊ दे :)

"कशाच्या पावलांनी आली ?"
…. हळदी कुंकवाच्या , सोन्यामोत्याच्या 

" काय ल्याली? "
…. पिवळ पितांबर 

  " काय खाल्ली ?"
…भाजी भाकरी 

मग सगळ्या घरभर फिरून सखुची गौराई , चिऊ विचारायची "इकडे काय ? इकडे काय ?" सखू पण सगळ सगळ फिरून दाखवायची "हा दिवाणखाना , ही  मोरी , हे देवघर , हे दुधदुभत " चिऊला लहानपणी प्रश्न पडायचा ही गौरी कोण ? माझ्या हातातल्या कालाशातले घडे , की हे डहाळे  की मी ?

मग सगळ घरदार फिरून झाल्यावर गौराबाई बाप्पाशेजारी विराजमान व्ह्यायच्या . शेपू भाजी आणि वडी भाकरीचा आनंद घ्यायला .  गौरीला आल्याआल्या भाजी भाकरी का द्यावी लागते ह्याच उत्तर चिऊला तिचं लग्न झाल्यावर अपोआप मिळाल . "चिऊ … फुगली ग तुझी भाकरी . घे ताट वाढून " अस जेव्हा सखू माहेरी राहायला आलेल्या चिऊला म्हणायची तेव्हा तिला पुरणपोळी ही नको वाटायची त्या बदल्यात. कुणीतरी म्हटलंच आहे "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते " 

हे सगळ असच्या अस्स घडतंय हा भास चिऊ ला आज सकाळपासूनच होत होता . कशातच लक्ष लागेना पोरीच . इतक्या लांब राहायला गेली होती मग तिथे कुठला आलाय गणपती आणि गौरी ? तिथे नुसते चर्च पण तरीही चिउने घराच्या गणपतीची छोटीशी आरास केली होती खीर मोदकाचा नैवेद्य देखील केला . गौरीचा नैवेद्य करायला शेपू सारखी कुठलीच भाजी नाही मिळत म्हणे तिकडे आणि भाकरी करायचा तर प्रश्नच नाही इलेक्ट्रिक शेगडी आहे आता तिच्या घरी :)  गौरीच्या खेळाची हौस पुरवायची म्हणून चिऊ गेले २ दिवस ठरवून रात्री उशिरा फोन करायची सखुला …. माहेरी कुणी डाव मांडला असेल तर आवाज तरी पडेल कानी झिम्म्याचा . पण यावेळी सखूच अंगणही तिच्यासारखाच शांत शांत होत . खेळाचा डाव मांडायला खेळणारी लाडकी लेक नाही म्हटल्यावर तीलातरी कुठला हुरूप येईल हो . गेल्या २० वर्षात तिचं अंगण आज पहिल्यांदा शांत होत . तिच्या माहेरवाशिणीची, चिऊची वाट बघत   

कसातरी करून स्वतःला आवरलं होत आज सखूने पण सकाळी गौरी घरात घ्यायची वेळ झाली आणि तिची घालमेल वाढली . पोरीचा चेहरा डोळ्यासमोरून हलेना . तशीच दिसत होती चिऊ तिला समोर "आई तुझी जोडवी दे ग हाताच्या बोटात घालायला …. अजून जास्त वाजेल घागर माझी  " म्हणणारी.…  दोन वर्षापूर्वी तर चिउने कहरच केला . नको नको म्हणताना ८ व्या महिन्याचं पोट घेऊन नाचवली घागर . बाकीच्यांना टेन्शन "पोटातला हिचा गणोबा काय करतोय काय माहीत :)"  

ह्या सगळ्या आठवणी मनात दाबून कंठाशी आलेला आवंढा गिळत सखु आज तिची गौराबाई घरात घेत होती . इतक्यात फोन वाजला . हातातलं सगळ जागीच टाकून सखु पाळली "माझ्या लेकीचाच असणार … जीव नसेल लागत सकाळपासून तिचा तिकडे " 

"आई …. गौरी घेतल्यास ग ? " 
चिऊच्या कापणारा आवाज त्यामागचा ओलावा सखुला जाणवला 
"पोरी … माझी गौराबाई रडत नाही येत घरात आईच्या. माहेरच्या भरभराटीसाठी हसत आत ये  "
आणि चिऊ ओक्साबोक्शी रडायला लागली फोनवरच . 

ती फोनवर बोलते आहे तोवर तिच्या पिल्लाचा एक पराक्रम चालू होता …. आता फार उद्योगी झालाय न हा कृष्ण तिचा . आता आईची अंगाई  नको असते त्याला . Justin Bieber च " baby baby " म्हणायला लावतो आई बाबांना . 

चिउने आरास केलेल्या गणपतीसामोरच कुंकू घेऊन साहेब सगळ्या कपाळाला फासत होते . चिऊ ओरडली "पिल्ला थांब … देवबाप्पाच आहे ते "
तिची हाक कानापर्यंत जाईतोवर तो कुंकवाची एक चिमट जमिनीवर सांडून त्यातून दुडूदुडू पळत सगळ्या घरभर नाचला . आणि त्याची इवली इवली कुंकवाने भरलेली पावलं घरभर उमटली
  
सखुने एक क्षण थांबून विचारलं "काय झाल ग चिऊ …. का उगाच ओरडते आहेस त्याला ? बोल का फोन केलास आत्ता ?"
"काही नाही ग आई …… गौराबाई तू घरात घेतलीस आणि हळदी कुंकवाची पावलं माझ्या घरी उमटली :) "

आमची चिऊ म्हणजे हा असाच प्रकार आहे … तिला जे हव असत ते समोरच्या प्रत्येक गोष्टीत शोधायचा प्रयत्न करते आणि सापडलं कि आनंद गगनात मावत नाही 

आईचा फोन ठेवल्यापासून स्वारी खुशीत आहे एकदम :) 

मानल तर सगळ आहे इथे आणि नाही मानल तर काहीच नाही सापडत 

गणेशोत्सवात ती येउन गेल्यावर प्रश्न पडतो - कोण आलं होत ? खडयाची, मुखवट्याची , एरंडाची , मातीची गौराई की लग्न होऊन सासरी गेलेली आपली लेक ? 

View Facebook Comments


कांदे पोहे

मुलगी पाहायचा कार्यक्रम बहुतेक प्रत्येक मुलीला करावा लागतो … 
एक प्रयत्न , नेमक काय चालू असत त्यावेळी मनामध्ये तिच्या ?




त्याची अन तिची तशी पहिलीच ही भेट 
साडी नेसून १ तास झाला , किती करायला लावशील wait ?
मनुमावाशी म्हणत होती  , गोरापान आहे नवरामुलगा 
पण या मोठ्यांच्यातून नजर वर करायला असणार आहे कुठे तिला जागा ?
म्हणे ६० हजार  पगार आणि  ९ लाखाची आहे त्याची गाडी
हुंड्याला नाही सांगा आधीच , जर पडली पसंत ही पाटलांची वाडी 

आलीच वाटत मंडळी , आईने पदर घेतला ना डोक्यावर 
१ तास उशीर झालाय आणि म्हणे आम्ही घड्याळाच्या ठोक्यावर 
एवढा मोठ्ठा लवाजमा , यांचा साखरपुड्याचा नाही न बेत
पहिल्या वहिल्या भेटीसाठी कुणी इतके जण नाही घेवून येत 
जाऊ दे …… मला काय , नुसत जाउन खुर्चीतच तर आहे बसायचं
आज पुन्हा एकदा जमिनीला नजर खिळवून हसायचं   

इतका कुणाचा आवाज हसण्याचा बायकांच्या खोलीतून ?
आजी …. कुणासाठी खुडतेय जाई परड्यातल्या माझ्या वेलीतून ?
वातावरण इतक कस वाटतंय निवांत आणि हसर
दादाच्या आगाऊ smile मागे मला जाणवतच होत काहीतरी फ़सर
ही आता कोण चिमुरडी खेटतेय बाबाच्या येवून अंगाला
काहीतरी वेगळा वास येतोय मला या कांदे पोह्याच्या सोंगाला  

पुन्हा एकदा कापेल माझा हात , चहाच्या त्या ट्रे मागून
अन मिशीवाला सासरा  म्हणेल " पोरी … नाव काय तुमच ?" माझ्याकडे बघून 
( सासरा … होणारा की न होणारा अजून ठरलं नाहीये )
ठरल्याप्रमाणे पोह्याची प्लेट आत्या आतून घेवून येईल
अन समोर बसलेला ' तो ' , चव न घेताच घास गिळून घेईल 
असंच असत हो हे … उत्तरं द्यायला आवाजच नाही फुटत
अन धडधडणारा श्वास आतल्या आत सुटकेसाठी धडपडत    

लागला तर jackpot नाही तर ठणठणाट
कधी कुणी click होईल सांगता येत नाही क्षणात 
आईला आवडलेली मुलगी , पोराच्या स्टेटस ला नसते होत म्याच 
आणि सगळ जुळून आल तर कुंडलीतले २६  गुण असतातच घ्यायला कॅच
कपातल हे वादळ शांत व्हायला थंड डोक्याच घर लागत मिळाव
कुंडलीतले ग्रह जुळवत बसण्यापेक्षा घरातल्या मनांनी जुळाव 

(झालं …… डोक्यातले विचार नेहमीप्रमाणे डोक्यापर्यंतच थांबले …)

अजून कस कुणी मला नाही आल बोलवायला ?
मुलगी पाहायला आलेत की घराचे वासे पाहायला ?
सासू म्हणवणारी प्रेमळ बाई अचानक खोलीत आली 
"बघण्याचा कार्यक्रम करायला ,आमची सून शोभेची वस्तू नाही " डोक्यावर हात ठेवत म्हणाली 
एक एक करत मग सगळ्याचा झाला मला उलगडा
किणकिण आवाज करत होता माझा हिरवा चुडा 

अख्ख्या ट्रेकिंगचा क्षीण घालवणारा हाच तो (माझा नवरा?) महाभाग 
का आवडली आईच्या 'त्या ' मैत्रिणीला (माझी होणारी सासू हो) माझी जाईची बाग
मनुमावाशीच्या वास्तुशांतीत मिशीवाल्या काकांनी (हे म्हणजे आमचे सासरे बुवा) वाढला होत एक एक्स्ट्रा गुलाबजाम
अन ट्रेकिंगमध्येही माझ्या चुकून झालेल्या स्पर्शाने का फुटला त्याला दरदरून घाम :)
" पाहण्याचा " कार्यक्रम असा मुलगी न पाहताच झाला
अन आईच्या डोळ्यातला थेंब , दादा माझ्या नकळत पुसून गेला






कळसातील पाणी

लग्न म्हणजे हजार प्रथा … विधी . त्यातील एक म्हणजे कळस … तसं पाहायला गेल तर बोहल्यावर चढणाऱ्या मुलीच्या अंगावर २ वेळा हे कळसातील पाणी पडत . एक म्हणजे लग्नाच्या आधी एक दिवस … हळदीच्या वेळी आणि दुसर म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी …. सासरी 

लहानपणी पडणाऱ्या बालीश प्रश्नांपैकी हा एक प्रश्न … का घालत असतील नवरी मुलीला कळसात पाणी ? आणि ते ही  २ वेळा ??  
पण म्हणतात ना …… अशा गोष्टींचा अर्थ लागायला कळसातील पाणी पडाव लागत डोक्यावर 

खरच या सगळ्या प्रथा नुसत्या प्रथा नाहीत तर त्या मागे फार मोठा अर्थ असतो . बस , तो अर्थ कुरवाळून समजावून सांगणारी एक आई नशिबाला असावी लागते . जी मला लाभली . 

इतके वर्ष न राहवून ' तो ' बालीश प्रश्न शेवटी मी तिला विचारला … माझं लग्न ४ दिवसांवर असताना . टपोऱ्या डोळ्यात पाणी आणून पदराची सावली देत जवळ घेऊन तिने जे मला सांगितल ते आयुष्यभर असं च्या असं मनात साठून राहील माझ्या :)

डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत आई बोलत होती 

देव जेव्हा प्रत्येकाच्या नशिबात प्रेम वाटत असतो तेव्हा ज्याच्या झोळीत तो मुठभर प्रेम जास्त घालतो त्याला मुलीचा जन्म मिळतो . मुलीला जन्मजातच सगळ्या गोष्टी २ - २ मिळालेल्या असतात . २ घर , सासू म्हणजे आई आणि सासरा म्हणजे बाबा , म्हणून २ आई बाबा , लाडक्या दिरासारखा अजून एक मित्र , नणंदे सारखी मैत्रीण  . मग इतक्या सगळ्या गोष्टी २ असताना कळसातील पाणी एकच कस असेल ??

पहिला कळस माहेरचा. आईच बोट धरून चालशील … शेवटच …. उद्यापासून नवऱ्याच बोट धरून चालायचं  , पाहिलं पाणी आईच्या अंगावरून ओघळून मुलीच्या अंगावर पडत . 

ते पाणी तिला सगळ्या जुन्या गोष्टी पदरात बांधून घ्यायला सांगत आणि उरल्या सुरल्या कळसात सोडून जायला सांगत .

  

- आईची माया पदराच्या टोकाला बांधून ने …. सासरच्या उंबऱ्यावर ही गाठ सोडून मग आत प्रवेश कर , अंगणापासून तुझ्या प्रेमाची लयलूट होऊ दे 

- ज्यांच्या बोटाला धरून पाहिलं पाऊल टाकलस त्या बाबांचे लाड मुठीत गच्च मिटून सांभाळून ने .  सासरी कधी एकटी पडलीस तर ही मुठ तुला कधीही एकट सोडून जाणार नाही . डोळ्यातलं पाणी पुसायला बाबाचा हात पुढे येईल 

-  बहिणीची माया कमरेला गुंडाळून ठेव . मणका दुखेतोवर काम करताना तिच्या गोंडस आठवणी भार हलका करायला कामी येतील 

-  बंधुराज तुझ्यापेक्षा धाकटा असला तरी तुझ्यापेक्षा मोठा होवून आजवर तुझी सावली सुद्धा सांभाळली . त्याचा मोठेपणा मुंडावळ्या सोबत कपाळाभोवती गाठवून घे . घराच्या ४ भिंती एकत्र ठेवायला तुलाही कधीतरी मोठ व्हावं लागेल . मोठेपणाने बरच काही पोटात घ्यावं लागेल , बरच काही विसरावं लागेल . तेव्हा होईलच की  आठवण भावाची …. तुझा शब्द कधीही नाही मोडला त्याने 

- बाकी राहिलं ते चिंचेच्या झाडाखालच बालपण, कैरीच्या फोडेसाठीची भांडण , सायकल शिकताना मैत्रिणीने आधारासाठी दिलेला हात, आजी सोडून गेली तेव्हा मन मोकळ करायला दिलेला तिचा खांदा , तुझ्यासाठी जागवलेल्या रात्री आणि बरच काही ……. जे सगळ आज या कळसातल्या पाण्याबरोबर वाहून जाईल . इथेच सोडून जाव लागेल तुला हे सगळ

दुसरा कळस सासरचा , लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पाणी नवऱ्याच्या अंगावरून ओघळून तुला भिजवेल 


   
ते पाणी तुला सगळ सगळ नव्याने करायची शक्ती देईल . नव घर उभ करायची ताकद देईल 

- नवऱ्याच्या प्रेमाने चिंब भिजशील तरच सगळ पेलता येईल .  

- दिराच्या सुखासाठी बाप्पाकडे रोज मस्तक टेकव.  हिरव्या चुड्याच्या किणकिण आवाजासाहित तो तुझे मोकळे दिवस परत आणून देईल  

- नणंदेच्या गप्पांसाठी तुझी दुपार राखून ठेव . बघ …. सगळा क्षीण निघून जाईल 

- सगळ्याच सासवा खाष्ट नसतात ग . . . कळसातल्या पाण्याने जड झालेली साडी तुला हेच सांगेल . आता कामाचं वजन वाढलाय वहिनीसाहेब …. नीरी सांभाळून पाऊल टाका . वाट दाखवायला ही माउली कधीही तयार असेल 

- आणि सासरा म्हणजे तुझ हक्काच लाडाच अकाउंट. मुलगी म्हणून घरात घेतील आणि प्रत्येक वेळी बापाच्या मायेने पाठीशी घालतील   

:)

दोन्ही कळसात चिंब भिजलीस तरच संसारात चांगली मुरवतीची होशील :) आणि हो … कळस उचलताना तुझ्या अंगाला त्याचा स्पर्श नाही होऊ द्यायचा 
आपल कोंदण आपण जपायचं … आपल्या माणसासाठी :) 

View Facebook Comments


पोस्टशंभरी


ही पोस्ट वाचण्याआधी एक विनंती … या पोस्टमधील " निळ्या रंगातील शब्द " reference link म्हणून वापरले आहेत. हे शब्द म्हणजे या ब्लॉगवरची एक कविता …. जवळपास सगळ्या कवितांची शीर्षके माळून ही पोस्ट लिहिली आहे .  एक छानशी गोष्ट . संबंधित कविता वाचण्यासाठी कृपया reference link ( blue letters ) वर click करा .       



आजची ही पोस्ट म्हणजे मी मजल दरमजल करत गाठलेला पहिला टप्पा …. या ब्लॉग वरची माझी शंभरावी पोस्ट . तुमच्या या अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद :)

तश्या माझ्या कवितांनी हा आकडा कधीच पार केलाय म्हणा माझ्या डायरीमध्ये. तरीही … तुमची दाद मिळालेली ही शंभरावी.  
पण ही शंभरी नाकी नऊ आणणार अस वाटतंय कदाचित . म्हटलं १०० वी पोस्ट म्हटल्यावर काहीतरी खास लिहावं .काहीतरी सुरेख…कविता जमली पाहिजे …. माझ्या ब्लॉगच सेलिब्रेशन मी नाही करणार तर कोण ? पण म्हणतात ना …. काहीतरी ठरवून लिहायला बसल की शब्द रानातल्या पाचोळ्यासारखे सैरभैर उडून जातात . कुठेच काही गुंफता नाही येत. 

सरस्वतीसमोर मांडी घालून, लेखणी घेऊन बसताना जर तुम्ही वहीच्या पानाच्या डोक्यावर विषय कोरून बसलात तर कितीही वेळ तिची आराधना करा …. पान कोर ते कोरंच राहील :) . त्याऐवजी रिकाम्या मनाने बसून लेखणीतून उमटेल ते लिहित जावं …. अप्रतिम निर्मिती झाल्यावाचून राहणार नाही. आणि हे माझ शंभराव पान … पहा , अजूनही कोर :)

शंभरी म्हटली की ब्लॉग ची काय आणि माणसाची काय …… सगळ गणित एकचं . आकडे १ पासूनच  सुरु होत १०० पर्यंत पोहोचणार . म्हणजे असं ….   

आई चिमुकल्या पावलांची वाट पहात असते.  " फक्त एकदा येऊन जा " म्हणत बाळाच्या बोबड्या बोलांसाठी आतुर झालेली असते . आणि ती प्रतिक्षा संपते तब्बल ९ महिन्यांनी . जखमा कशा सुगंधी झाल्यात म्हणत आई सगळ्या वेदना अगदी धैर्याने सहन करते . पोटातला जीव " माझाच कुणीतरी " असतो ना तिच्यासाठी . :) . 

आई म्हणून घडताना …. " काय काय होत हे तेव्हाच जाणवत . हातात येत ते कन्यारत्न . बघता बघता " एक वर्ष झालं " तिला . " बाबा आज राहू दे office " म्हणणारे निरागस भाव चिमुकल्या डोळ्यात दाटलेले . आजी आजोबा खेळायला नाहीत म्हटल्यावर बाप्पाच्या पायरीवर रांगत जाऊन " आजी आजोबाना माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे " ही विनवणी करायची … " तिला इतकंच कळत " :)
  
या आणि अशा बर्याच तिच्या त्या बालिश आठवणी 

मुलगी नाशिबवानाच्या घरी जन्माला येते म्हणतात .मुलगी म्हणजे … विश्वनिर्मात्याला पहाटेच्या साखरझोपेत एक सुंदर स्वप्न पडाव … अशी निर्मिती … पण तरीही " मुलगा असते तर … " अस वाटतच हो कधीतरी कारण मुलगी म्हणजे " निखारा "  आणि हे कधी कळत ?? जेव्हा ती एकाच वेळी दोन जिवलग मित्रांना आवडते  " अशीच एक भावना , जिला शब्दच फुटत नाही " आणि समोर उभा राहतो तो Propose Day 

हे झाल पहिल्या कन्यारात्नाबद्दल.  

आता बायको आई झाली म्हणून  पन्नाशी  थोडीच गाठली  लगेच ? " तो आणि त्याची सौ … " दोघांचेही सोनेरी दिवस आत्ता कुठे सुरु झालेत ." सगळ किती सहज पेललस " म्हणत तो ही तिची दाद देतो .  एक दिवस जरी त्याच्याशिवाय काढायचा म्हटला कि लग्गेच " तुझ्याशिवाय …. " !!!! अस वाटत न अजून तिला. आणि एखाद गुलाबाचं फूल " बघ माझी आठवण येते का " हे सांगायला
जाता जाता तीच हे वाक्य " मुडकर न देखना " आणि मग रात्रभर दोघांचीही " आज झोपच आली नाही " अशी अवस्था ठरलेली . आता तुम्हीच सांगा " काय राव … हे काय बर आहे ". 

" तसं पाहिलं तर " अहो " I miss my college days "म्हणतच दोघांच्या संसाराची सुरवात झाली. दोघे एकाच कॉलेजचे म्हटल्यावर या लवस्टोरी मध्ये " तू मात्र अशीच " ही तक्रार करत एखादी " बालमैत्रीण " तिला सोडून गेली तर त्यात नवल ते काय ? अहो ते दिवसच मंतरलेले " पाहिलं प्रेम कस विसरायचं ? ". साठवलेल्या ओल्या चिंब भेटी " आठवतंय तुला ? "  म्हणत म्हणत 
  
आनंदाने भरलेल्या अंगणात " ओठावरच हसर गाण … देठासहित खुडून दिलस म्हणावं असा एक सखा ज्याचे आयुष्यभर धन्यवाद मानले तरी थोडेच . त्या सख्याच्या प्रेमात ती … प्रेम म्हटलं कि चंद्र आलाच पाहिजे की हो सोबतीला " चंद्राबरोबर तू ही हवा होतास " अस कितीतरी वेळा वाटत . आणि आजूबाजूचा प्रत्येकजण मग विचारत राहतो " प्रेमात कुणी पडलंय का ? ". मग " भावनांचा गुंता " अगदी अपेक्षितच. नको वाटते ही माणसांची गर्दी… " सगळ्यांपासून दूर ", " चंद्रालाही दूर लोटत " " सुटत चाललेली वीण " ओवायला पहिली की एकाकी रात्री " चांदण मुक्याने बरसत " आणि नेमक त्याच वेळी " कुणीतरी पाहत " :)

बर …. हे झाले जुने दिवस जुन्या आठवणी 
आणि आत्ता … कन्यारत्नाला एक वर्ष झाल रे झाल की त्याच onsite आ …… वासून उभ राहत त्यांच्या समोर … तो जातो …ही  इथेच …… :(  " Being a mother " चा रोल पुरेपूर निभावत  

" त्याच्या श्वासातला एक अखंड श्वास बनून " इतके दिवस त्याचा  " पारिजात " " स्पर्श " अनुभवल्यावर तिला त्याची रोजच " आठवण होते ". अराशासामोरच तिचं ते " एकाकी देखणेपण " आणि डोळ्यात धारा पण " वाहायचं थांबेल … तर पाणी ते कुठल ? "

छोट छोट पिल्लू आईला सांगत " Distance does't matter " मम्मा :) .आपण " एरोप्लेन " नवीन आणू .  बाबा रे " या आईला खरच नाही कळत काही " बघ एकदा कसे " साचलेत डोळ्यात तिच्या कोपर्यावाराचे ढग  
हि आणि अशी बरीच समजावयाची चिमुकली वाक्य . मग आईने कौतुकाने जवळ ओढल कि म्हणायचं " अग बाई … तुझाच आहे मी , कशाला उगाच भितेस ? "

" डोळ्यातले थेंब " बघून " ब्लॉग रायटिंग " वाली मैत्रीण विचारते " कशी आहेस ग ? " . यावर तीच ओलं चिंब उत्तर : संध्याकाळी शुभंकरोती " म्हणायला बसल तरी तिला " हल्ली तो मला देवळात दिसतच नाही ". काय करू ? " हल्ली हे असच होत हो "

सगळ अंगण आनंदाने भरल तरीही प्रत्येकाकडे " माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा " असतोच नेहमी आणि वाईफची " हाउसवाईफ " होता होता " सुटून गेलेले क्षण " परत आले तरी  " आता काय कामाचे ? "  

ही गोष्ट अशीच चालू राहील …. पुन्हा कधीतरी बोलू 
फार लिहावस वाटतंय … " तरीही आज ठरवलंय " बस … इथेच " The End च पोस्टर " लावायचं आणि ही नऊ महिन्यांपासून सुरु झालेली ही पोस्ट " सराणावरच्या मरणा " पर्यंत येउन शंभरी पूर्ण करायची :)

धन्यवाद !