स्पर्श ....
जन्माला आल्यापासून आपण कितीतरी प्रकारचे स्पर्श अनुभवले आहेत....अजून अनुभवायचे बाकीही असतील काही
डॉक्टरच्या पहिल्यावहिल्या धपाट्या पासून होते याची सुरुवात ..
पण प्रत्येक स्पर्श खुपकाही वेगळ सांगत असतो .. वेगळ जाणीव करून देत असतो . जेव्हा शब्द बोलून बोलून थकतात . डोळे पापण्या मिटून घेतात आणि सार काही ह्याच्या स्वाधीन करतात ..तेव्हा सुरु होतो स्पर्शाचा खेळ ( सॉरी ...खेळ नाही .... भेळ म्हणायचं होत मला ... बऱ्याच चवी असणारी )
म्हणजे बघा ना ....
कधीतरी एकदम अनपेक्षित अस घडून जात ..एकदम रागाचा पर चढतो , आपण कुणावर तरी प्रेम करत असतो आणि ती आपल्या समोर येउन अचानक उभी राहते , कुणाचीतरी पावलं दूर जाताना दिसली कि आवरतच नाही घशातला हुंदका किंवा तुमच बाळ तुम्हाला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारत
असे काही क्षण ...आपण काहीच react नाही करू शकत . काय बोलायचं सुचतच नाही अशा वेळी.एक नाजूकसा स्पर्श सगळ काम एकदम आरामात करून जातो . दोन सेकंदात मन हलक वाटायला सुरु होत .
अनुभवलाय कधी असा स्पर्श ?
जॉब मिळालेल्या दिवसापासून लगबग सुरु असते bag भरायची .. आई ला सोडून आजपर्यंत कधीच नाही राहिलि ती ..तरीही जॉब साठी जाव लागेल लांब ... म्हणून तयार होते आणि जायच्या वेळी
घरातून पाऊल बाहेर ठेवताना आई इतकच म्हणते " सांभाळून रहा ". काय बोलायचं कळतच नाही . पाय उंबऱ्यातच अडखळतो. जाऊन आई ला एक घट्ट मिठी मारते ती .चांदण्यांनी भरलेल्या आभाळातून निखळून पडाव इतक एकट वाटायला सुरु होत तिला पुढच पाऊल उचलताना
अनुभवलाय कधी हा लेकीच्या मायेचा स्पर्श ?
लहानपणी आईच्या मांडीवरची अंगाई , केसातून फिरवलेला हात , बाबांच्या खांद्याशी स्पर्धा , दृष्ट काढताना आजीची मोडलेली बोट,
सरांची छडी लागू नये म्हणून मित्राने मध्ये घातलेला हात , सायकलवरून पडल्यावर बाबांनी पाठीवर ठेवलेला हात
असे अनेक बरेच स्पर्श .. ताकद देणारे , बरसणारे , तरसणारे ..कितीतरी वेगळे
बाळ झाल्यापासून जीवाच्या वर जपते आई त्याला. आणि दात यायला लागल्यावर एके दिवशी बाळराजे कडकडून चावा घेतात आई च्या गालाचा ..खरतर तिला ओरडायच न्हवतच..पण कळ इतकी जास्त होती की चुकून रागावली ती बाळाला ... आईच्याही डोळ्यातून पाणी वाहायला लागल ... बाळ हुंदके देऊन रडत होत ... आई ओरडली म्हणून न्हवे ... आई च्या डोळ्यात पाणी दिसलं म्हणून ... काय बोलाव काहीच सुचेना तिला .. जवळ घेउन तिने त्याला घट्ट मिठी मारली .. सगळ क्षणात शांत झाल
अनुभवलाय कधी हा आईचा उबदार स्पर्श ? .
लग्न ठरल्यावर तो आणि ती पहिल्यांदाच फिरायला जातात .दोघेही अगदी सुरक्षित अंतर ठेऊन .कितीही पाऊस कोसळत असला तरीही . अचानक समोरून कुलकर्णी काका येताना दिसले तिला ( या काकांची खासियत ती त्याला लग्नानंतर ऐकवते ). काकांना पाहून ती एकदम त्याचा हात हातात घेते ( हा माझा हक्काचा नवरा आहे हे सांगायला ). आणि तो ... अंगातून वीज जावी इतका स्तब्ध होतो ..तिच्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने
अनुभवलाय कधी तिचा प्रेमळ भिजलेला स्पर्श ?
कधी कधी तिला भांडायचं मूड येतो . तो ही वैतागून हॉल मधेच झोपून जातो . ती बेडरूम मध्ये एकटीच . अंधाराशी धिटाईने रात्र जागवत .सकाळी दोघेही चुकल्याचुकल्या सारखे वागत असतात . दोघानाही माहित असत .. मला सोडून झोप लागली नसणार एकट्याने . पण हि मौनाची दरी ओलांडायची कुणी ? इथे येउन अडून बसत सगळ .
कपाटाचा दरवाजा उघडताना चुकून ..हो अगदी चुकूनच .. तिच्या नुकत्याच न्हालेल्या केसांची एक बट याच्या अंगठीत अडकते . ती : "आऊच ..."
तिच्या या आवाजाने तो झटक्यासरशी मागे सरकतो .. दोघे काल भांडलो हे विसरून तो तिची बट नाजूकपणे सोडवू लागतो . अन ती येउन त्याला बिलगते
" M सॉरी . नाही रे राहू शकत मी तुझ्याशिवाय . मी चिडले म्हणून काय झाल . तुला नाही का जवळ घेत आल मला ? "
तिच्या या वाक्यावर तो मनापासून हसतो ( माहीतआहे मला ..मी जवळ घेतलं की तुझा राग कुठल्या कुठे पळून जातो ) आणि एकदा तिच्या केसातून हात फिरवत " भीती नाही वाटली अंधाराची काल तुला ? :) "
आता तिच्या अश्रूंचा बांध फुटतो .. त्याच्या कुशीत शिरून ती थांबवलेले सगळे हुंदके बाहेर काढते( तू डोक्यावरून हात फिरवलास की मी आपोआप शांत होते )
अनुभवलाय कधी हा एका रात्रीच्या विराहानंतरचा सौं. चा प्रेमाच्या अधिकाराचा स्पर्श ? :)