तो म्हणजे ...

तो म्हणजे एक थेंब 
अळवाच्या पानावर विसावणारा 
काही क्षण चमकून ओघळून जाणारा 
दुसऱ्याच क्षणी ... नवीन थेंबाशी एकरूप होणारा 

तो म्हणजे निरभ्र आभाळ 
इंद्रधनुच्या कमानीला आपलं घर देणारा 
विजेच्या समईने त्याच्या देव्हार्यातील नंदादीप लावणारा 
कोटी सूर्य किरणांनी ... दिवाळी साजरी करणारा

तो म्हणजे उनाड वारा 
लाजाळूच्या पानांशी लपंडाव खेळणार 
अगदी नकळत ... ओठांना स्पर्शून जाणारा 
साऱ्या रानभर पसरूनही कधीही न दिसणारा  

तो म्हणजे एक कविता 
रात्रीच्या एकांताला  सोबत म्हणून लिहिलेली 
मनातल्या स्वप्नाला कागदावर का होईना ... खर करणारी 
पानभर पसरूनही मनात थोडी उरणारी  


  

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)